maharashtra

युवकाचे अपहरण करुन गंभीर मारहाण करणाऱ्या साताऱ्यातील आठजणांना अटक

युवक गंभीर जखमी : आनेवाडी टोलनाक्यावरुन शनिवारी केले होते अपहरण

साताऱ्यातील एका युवकाचे आनेवाडी टोलनाक्यावरुन अपहरण करुन त्याला गंभीर मारहाण केल्याप्रकरणी भुर्इंज पोलिसांनी सैदापूर, शाहूपुरी परिसरातील आठजणांना अटक केली आहे.

सातारा : साताऱ्यातील एका युवकाचे आनेवाडी टोलनाक्यावरुन अपहरण करुन त्याला गंभीर मारहाण केल्याप्रकरणी भुर्इंज पोलिसांनी सैदापूर, शाहूपुरी परिसरातील आठजणांना अटक केली आहे. ही घटना प्रेमप्रकरणातून घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून मारहाण केलेला युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या आठजणांपैकी पाचजणांना कोंडवा, पुणे येथून तर तिघांना सैदापूर, सातारा येथून ताब्यात घेतले आहे.
या घटनेचा भुर्इंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक भंडारे व सहकाऱ्यांनी तातडीने तपास सुरु करुन याप्रकरणी साताऱ्यातीलच आठजणांना अटक केली आहे. या गंभीर घटनेनंतर मंगळवारी रात्री संशयितांची माहिती मिळाल्यानंतर भुर्इंज पोलिसांनी धडक कारवाई करत या गुन्ह्यातील समीर उर्फ शमीम सलीम शेख (वय 42), भैय्या उर्फ साहील शामीन शेख (वय 19, दोघेही, रा. सैदापूर, ता. सातारा), रिषम विलास राऊत (वय 30), विक्रम दत्तात्रय जाधव (वय 21), अमर गणेश पवार (वय 19), माणूस उर्फ कन्हैया दिलीप माने (वय 20), हरिष सुधीर भोसले वय 20 (सर्व रा. सैदापूर, ता. सातारा) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या घटनेबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी, सुजल शीतल बारवडे रा. शनिवार पेठ, सातारा हा युवक सध्या पुण्यात असतो. तो व या घटनेतील संशयित समीर उर्फ शमीम शेख यांची मुलगी साताऱ्यातील पोद्दार शाळेत शिकत असताना त्यांच्या मैत्री झाली होती. त्यातूनच सुजल हा शेख यांच्या मुलीशी मोबाईलवरुन संपर्क साधत असायचा. मात्र, ही बाब शेख कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी युवकाला किंवा त्यांच्या घरच्यांशी संवाद साधून यातून मार्ग काढायची भूमिका न घेता सुजल बारवडे याला गंभीर मारहाण केली आहे.
शनिवारी सुजल पुण्याहून साताऱ्याला येणार होता, ही माहिती शेख यांना मिळाली होती. त्यानंतर त्याला मारण्याचा प्लॅन ठरला. त्यातूनच मग सुजल ज्या गाडीतून येत होता. त्याचा पाठलाग करत शेवटी आनेवाडी येथे सुजल बारवडे याचे अपहरण शेख व त्यांच्यासमवेत असलेल्या युवकांनी केले. त्यानंतर सुजल याला बेदम मारहाण करण्यात आली असून या संशयितांनी त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब बारवडे यांच्या कुटुंबियांनी समजल्यानंतर त्यांनी सुजल याला साताऱ्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून अद्यापही सुजल याची प्रकृती गंभीर आहे.