maharashtra

पोलीस दलाच्या जागेत झाडे लावण्याची परवानगी नाकारली, गृहराज्यमंत्र्यांकडून दखल...!!


Rejection of permission to plant trees in the space of police force, notice from the Minister of State for Home Affairs ... !!

सातारा : सह्याद्री देवराई संस्थेला पोलीस दलाच्या जागेत झाडे लावण्याची परवानगी नाकारल्याची बातमी सर्वत्र फिरत असताना सरकार खडबडून जागं झालं आहे. सह्याद्री देवराई संस्थेचा उपक्रम अतिशय चांगला असून याबाबतच्या अडचणी सोडवल्या जातील, असं आश्वासन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिलं आहे.
पोलीस अधीक्षकांची परवानगी असताना तसेच विभागीय आयुक्तांचा होकार असताना एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश असताना देखील सयाजी शिंदेंच्या सह्याद्री देवराई संस्थेला पोलीस दलाच्या जागेत झाडे लावण्याची परवानगी नाकारण्यात आली. अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय वर्मा यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. 
सह्याद्री देवराई संस्थेला सातारा जिल्ह्यातल्या म्हसवे गावात पोलीस दलाच्या जागेत झाडे लावण्याची परवानगी तीन वर्षांपूर्वी मिळाली होती. सातारा पोलीस अधीक्षक आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून ही परवानगी देण्यात आली होती. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनीही कामाच्या ठिकाणी भेट देत प्रशंसा केली होती. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सह्याद्री देवराई संस्थेला शासकीय यंत्रणांनी मदत करावी, असा आदेशही काढला होता. त्यानंतर आता सह्याद्री देवराई संस्थेला पोलीस दलाच्या जागेत काम करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. 
खासगी संस्थेला पोलीस दलाच्या जागेत काम करता येणार नाही, असं कारण त्यामागे देण्यात आलं आहे. मात्र तीन वर्षांपूर्वी परवानगी देण्यात येऊन आत्ताच काम का नाकारलं हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. गृहराज्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. 
सध्या देशाभरात सर्वच स्तरातून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहे. ग्लोबल वर्मिंग आणि प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. उशीरा का असेना सर्वांनाचं आता शहाणपण सुचलेलं आहे. या सेलिब्रेटी सुद्धा मागे नाहीत. मराठी सिने सृष्टीतील अभिनेते सयाजी शिंदे यांनी यासाठी आवाज उठवला आहे. मी अन् माझे इतकाच संकुचित विचार न करता प्रत्येकाने पर्यावरणाच्या समर्थनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. झाडांमुळे मिळणाऱ्या शुध्द हवेचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्षलागवड करून ती जगवावीत, असे आवाहन वेळोवेळी सयाजी शिंदे यांनी केले आहे. मोकळ्या जागेत, डोंगरावर सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून झाडे लावली जातात आणि जगवलीसुद्धा जातात.