प्रवासात संतुलन बिघाडल्यानं परदेशी महिलेनं बसमधून पुढं जाण्यास नकार देत गोंधळ घातला. ती पलायन करीत असताना महामार्गावरील धावत्या वाहनाला धडकल्यानं जखमी झालेल्या महिलेवर भुईंज पोलिसांनी उपचार करुन तिला न्यायालयाच्या आदेशानं येरवडातील मनोरुग्ण रुग्णालयात दाखल केलं. नाबूनजीओ लाँय बीरुनगी (वय 40) रिपब्लिक ऑफ युगांडा असं तिचं नाव आहे.
भुईंज : प्रवासात संतुलन बिघाडल्यानं परदेशी महिलेनं बसमधून पुढं जाण्यास नकार देत गोंधळ घातला. ती पलायन करीत असताना महामार्गावरील धावत्या वाहनाला धडकल्यानं जखमी झालेल्या महिलेवर भुईंज पोलिसांनी उपचार करुन तिला न्यायालयाच्या आदेशानं येरवडातील मनोरुग्ण रुग्णालयात दाखल केलं. नाबूनजीओ लाँय बीरुनगी (वय 40) रिपब्लिक ऑफ युगांडा असं तिचं नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, युगांडामधील चाळीस वर्षीय महिला पर्यटनासाठी भारतात आली होती. मंगळवारी दुपारी बंगलोर ते मुंबई प्रवासात महामार्गावर बोपेगावनजीक तिचं मानसिक संतुलन बिघाडल्यानं ती बस चालकाशी हुज्जत घालू लागली. हुज्जत घालत ती बसमधून उतरुन एका हॉटेलमध्ये लपून बसली होती. हॉटेल व्यवस्थापनानं पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिस तिथं आल्याचं पाहून ती महामार्गावरुन पळू लागली. पळताना महामार्गावरील धावत्या वाहनाला धडकून रस्त्यावर पडून ती जखमी झाली. जखमी अवस्थेत पोलिसांनी तिच्यावर उपचार केले. त्यानंतर भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक आशिष कांबळे यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ती समजून घेत नव्हती.
तिनं पोलिस ठाण्यातूनही दोन वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला. मोठ्यानं आरडाओरड करुन गोंधळ केला. त्यानंतर पोलिसांनी तिला न्यायालयात नेलं असता, न्यायालयानं तिला पुणे-येरवडा येथील मनोरुग्ण रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर संबंधित महिलेला सहायक पोलिस निरीक्षक निवास मोरे, हवालदार घाडगे यांनी येरवडातील रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे आणि भुईंज प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल तांबोळी यांनी युगांडाच्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधून महिलेबाबत तिच्या नातेवाईंकाना कळविण्याबाबत संदेश दिला आहे.