जावली तालुक्यातील भुतेघर गावच्या वन हद्दीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात खिलारखोंडाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि.१९ रोजी घडली. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
केळघर : जावली तालुक्यातील भुतेघर गावच्या वन हद्दीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात खिलारखोंडाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि.१९ रोजी घडली. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भुतेघर, बाहुळे, वाळंजवाडी, तळोशी या परिसरात बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. भुतेघर येथील डोंगरालगत असलेल्या रानामध्ये शेतकरी विष्णू मानकुमरे यांची २ बैल, १ खिलारखोंड व शेळ्या रानात चरायला सोडले होते. मानकुमरे हे शेळ्यांजवळ होते. तर २ बैल, १ खिलारखोंड डोंगरालगत असलेल्या झाडीकडे चरत होते.
सायंकाळच्या सुमारास झाडीकडून २ बैल चरून आले. परंतू खिलारखोंड परत आला नसल्याने विष्णू मानकुमरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने खोंडाची शोधाशोध केली असता, दुसऱ्या दिवशी दुपारी भुतेघर गावच्या हद्दीतील आंब्याचा पेढा नावाच्या शिवारात खोंड मृतावस्थेत आढळून आला.
खोंडाची पाहणी केली असता बिबट्याने खोंडावर हल्ला करून मारले असल्याचे ग्रामस्थ व मानकुमरे यांनी सांगितले. दरम्यान बाहुळे येथील शेतकरी बाजीराव जाधव यांच्या दोन शेळ्यांवर बिबट्याने दोन दिवसांपूर्वी हल्ला केला होता. यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. त्यामुळे शेतशिवारात राहणाऱ्या व शेतात आपली गुरे घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या विभागात विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.