maharashtra

शासकीय दंड भरा, अन्यथा फौजदारी करू!

बेकायदा शुल्क वसुली प्रकरणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष साळुंखे यांचा इशारा

सुभाष साळुंखे आणि संस्थेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुनंदा शिवदास यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन संस्थेत चालणाऱ्या अनेक घटनांचा पोलखोल केला.

सातारा : शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा यांच्या श्रीपतराव पाटील हायस्कूल शाळेने विद्यार्थ्यांकडून तब्बल 21 लाख रुपयांचे बेकायदा शुल्क वसूल केले आहे. या शुल्क प्रकरणी राज्य शासनाने शाळेला पाच लाख रुपयाचा दंड केला आहे. या घटनेला सहा महिने उलटत आले अद्याप संस्था सचिव तुषार पाटील यांनी हा दंड भरलेला नाही. उलट विद्यार्थ्यांच्या खोट्या पावत्या तयार करून त्यांची फसवणूक केलेली आहे. हा दंड न भरल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष साळुंखे यांनी दिला आहे.
सुभाष साळुंखे आणि संस्थेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुनंदा शिवदास यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन संस्थेत चालणाऱ्या अनेक घटनांचा पोलखोल केला. साळुंखे म्हणाले, संस्थेची शाळा 100% अनुदानित आहे. असे असताना संस्थेने विद्यार्थ्यांकडून 21 लाख 50 हजार 605 रुपये शुल्क गोळा करून त्यामधून सभेच्या जेवणावेळी, ऑफिस खर्च, वीज बिल, ऑडिट फी, शिपाई-कर्मचाऱ्यांचे मानधन, कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस, शिक्षक व ऑफिस कार्यालय येथे चहापान यासाठी खर्च केला आहे. या संदर्भात माहिती अधिकारात माहिती मागवली असता ही घटना समोर आली. अनुदानित संस्थेला अशा पद्धतीने बेकायदा शुल्क वसूल करता येत नाही. शिवाय संस्थेने माध्यमिक शिक्षण विभागाची 16 लाख 25 हजार 488 रुपये परत केल्याची दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या चौकशी समिती या रकमेचा बेकायदा वापर आणि वसुली झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण अधिकारी माध्यमिक प्रभावती कोळेकर यांनी संस्थेला महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम 2011 मधील कलम 16 प्रमाणे पाच लाख रुपयाचा दंड केलेला आहे. या घटनेला आता चार महिने झाले तरी अद्याप संस्थेने शासकीय दंडाचे शुल्क भरलेले नाही. याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांकडे सुद्धा दाद मागण्यात आलेली आहे. मात्र संस्थेकडून हे दंडशुल्क भरण्यामध्ये वेळोवेळी टाळाटाळ होत आहे. संस्था सचिव तुषार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या खोट्या पावत्या तयार करून त्यांना शुल्क परत दिल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला आहे. काही पावत्या बोगस असून यावर ती परत केल्याची रक्कम भरण्यात आलेली नव्हती. संस्थेने यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करून दंड भरावा. अन्यथा त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला जाईल, असा इशारा साळुंखे यांनी दिला.
श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजे च्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुनंदा शिवदास यांनी सुद्धा आपल्याला 2012 ते 2016 या दरम्यान प्राचार्य पदापासून सक्तीने बाजूला ठेवण्यात आले. नियमबाह्य पद्धतीने दुसऱ्याच महिला शिक्षकेला पद देण्यात आले. या संदर्भात आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर शिक्षण विभागाने त्याची दखल घेऊन मला मुख्याध्यापक पद दिले. 2020 मध्ये मी सेवानिवृत्त झाले. असे असताना देखील संस्थेचे सचिव तुषार पाटील वेळोवेळी पत्र व्यवहार करत असतात. या पत्र व्यवहारांशी माझा कोणताही संबंध नाही. हे पत्र व्यवहार तात्काळ बंद व्हावेत, अन्यथा त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला जाईल, असा इशारा शिवदास यांनी दिला आहे.