maharashtra

मोबाइल शॉपी फोडून साहित्य चोरणारी तीन जणांची टोळी जेरबंद

१ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

मोबाइल शॉपीची भिंत फोडून आतील साहित्याची चोरी करणारी तीन जणांची टोळी जेरबंद करण्यात कराड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्याकडून १ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सातारा : मोबाइल शॉपीची भिंत फोडून आतील साहित्याची चोरी करणारी तीन जणांची टोळी जेरबंद करण्यात कराड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्याकडून १ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
वैभव वसंतराव पाटील, वय २३, रा. कोरेगाव, ता. कराड, अल्ताफ मगदूम मुल्ला, वय १९ आणि प्रतीक अजयचंद्र काळोखे दोघेही रा. चचेगाव, ता. कराड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ४ ते दि.५ नोव्हेंबर दरम्यान रात्रीच्या वेळी कराड येथील शाहू चौकात असणाऱ्या जय महाराष्ट्र मोबाइल अँण्ड गिफ्ट गॅलरी शॉपीची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी आज प्रवेश करून ७८ हजार रुपये किमतीचे मोबाईल व साहित्य चोरून नेल्याची तक्रार दीपक पुरोहित यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांच्या अधिपत्याखाली एक विशेष तपास पथक स्थापन केले होते. दरम्यान पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांना दि. १७ नोव्हेंबर रोजी माहिती मिळाली, कराड शहरामध्ये तीन इसम कमी किमतीमध्ये मोबाइलचे साहित्य व मोबाईल विक्री करत आहेत. पुणे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरलेल्या साहित्यपैकी ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल व ४० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण १ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, सखाराम बिराजदार, पोलीस अंमलदार सतीश जाधव, रघुवीर देसाई आदींनी सहभाग घेतला.