आरोग्य विभागातील कंत्राटी कॉन्ट्रॅक्टरकडून कर्मचाऱ्यांचा 'भूलभुलैया'
जानेवारीपासून पगार थकविले; निधीच प्राप्त न झाल्याच्या दावा, जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे बोट
कोरोना काळात सातारा जिल्ह्यात आरोग्य विभागाने अत्यंत उत्कृष्ट काम करत परिस्थिती आटोक्यात आणली असतानाच याच परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या अपप्रवृत्तींच्या 'लिला' आता पुढे येत आहेत.
सातारा : कोरोना काळात सातारा जिल्ह्यात आरोग्य विभागाने अत्यंत उत्कृष्ट काम करत परिस्थिती आटोक्यात आणली असतानाच याच परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या अपप्रवृत्तींच्या 'लिला' आता पुढे येत आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम तालुक्यात वास्तव्य करणाऱ्या आरोग्य विभागातील कंत्राटी कॉन्ट्रॅक्टरने जिल्हा रुग्णालयात काम केलेल्या ७ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे पगार जानेवारी २०२२ पासून थकविल्याची माहिती पुढे येत आहे. निधी प्राप्त न झाल्याचा दावा करीत संबंधित कॉन्ट्रॅक्टरने जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनालाच 'आरोपीच्या पिंजर्यात' उभे केले. मात्र जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने त्या कंत्राटी कॉन्ट्रॅक्टरला निधी देण्याचा आम्हाला कोणताही अधिकार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे त्या कंत्राटी कॉन्टॅक्टरचे पितळ उघडे पडले आहे. दरम्यान, या कंत्राटी कॉन्ट्रॅक्टरचे मोबाइल रेकॉर्डिंग कॉल प्रस्तुत प्रतिनिधीच्या हाती लागले असून कर्मचाऱ्यांशी बोलताना त्याने तुम्ही मला खूप त्रास दिला आहे. तुम्ही कामावर दारू पिऊन येता, अशी स्पष्ट कबुली देत तुम्हाला जानेवारीपासून एकदम पगार मिळणार नाही, थोडा थोडा मिळेल असे सांगत घोडा लावण्याचे धोरण अवलंबिले असल्याचे दिसून येते.
याबाबत एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेली माहिती अशी, मार्च २०१९ साली शेवटच्या आठवड्यात सातारा जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला. जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबवत आरोग्य विभागात काही कंत्राटी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली. सप्टेंबर २०२१ पर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख कमी झाल्यामुळे आरोग्य विभागात काम करणाऱ्या काही कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी ७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती सातारा जिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीनेच करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील पश्चिम तालुक्यात वास्तव्य करीत असणाऱ्या कंत्राटी कॉन्ट्रॅक्टर याचेच ते कंत्राटी कर्मचारी होते. त्यातील काही ऑक्सीजन प्लांट तर काही जिल्हा रुग्णालयातील वार्डमध्ये कर्तव्य बजावत होते.
संबंधित कंत्राटी कर्मचारी आरोग्य विभागात काम करत असताना त्यांचे पगार सातारा जिल्हा परिषदे अंतर्गत कंत्राटी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून होत ह़ोते. मात्र त्यांची नियुक्ती सातारा जिल्हा रुग्णालयात करण्यात आल्यानंतर त्यांचा पगार रुग्णालयाच्या माध्यमातून होऊ लागला, असे त्या कंत्राटी कॉन्ट्रॅक्टरचे म्हणणे आहे. डिसेंबर २००१ पर्यंत त्या कॉन्ट्रॅक्टरने बऱ्यापैकी कर्मचाऱ्यांना पगार दिला मात्र त्यानंतर पगारा अभावी त्या कर्मचाऱ्यांची हेळसांड होऊ लागली. याबाबत त्या कर्मचाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरकडे विचारणा केली असता मला सप्टेंबर २०२१ पासून पैसे मिळाले नाहीत. मी जिल्हा शल्यचिकित्सक यांना मेसेज केले आहेत. त्यांनी अद्याप निधी प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. मे २०२२ अखेर निधी प्राप्त होईल असे त्यांनी सांगितले असल्याचे सांगून जिल्हा शल्यचिकित्सक यांनी निधी दिल्यानंतर तुमचे पगार करू असे सांगत त्या कॉन्ट्रॅक्टरने कंत्राटी कर्मचाऱ्यांची बोळवण केली.
ते अधिकार आम्हाला नाहीत : डॉ. सुभाष चव्हाण
जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्हा रुग्णालयात कंत्राटी कामगार म्हणून कर्मचाऱ्यांना घेण्याचा अथवा कमी करण्याचा रुग्णालयीन प्रशासनाला कोणताही अधिकार नाही. त्यांना कामावर घेणे अथवा त्यांचे पगार करणे यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा आहे. संबंधित कंत्राटी कॉन्ट्रॅक्टरचे कॉल रेकॉर्डिंग मी ऐकले असून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत त्या कॉन्ट्रॅक्टरने माझा उल्लेख केला आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. तुम्ही संबंधित कॉन्ट्रॅक्टरला माझ्या पुढे घेऊन या... मग पहा दूध का दूध आणि पाणी का पाणी कसे करतो. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या या प्रतिक्रियेमुळे संबंधित कंत्राटी कॉन्ट्रॅक्टर त्या कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळत असल्याचे स्पष्ट होत आहे.