maharashtra

बेशिस्त वाहतुक प्रकरणी ६५ लाखाचा दंड वसूल

५५८ वाहन चालकांचे परवाने निलंबित

65 lakh fine recovered in case of unruly traffic
जिल्हा वाहतूक शाखा व शहर पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेमध्ये ५५८ जणांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. त्याचबरोबर तब्बल ६५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सातारा : जिल्हा वाहतूक शाखा व शहर पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेमध्ये ५५८ जणांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. त्याचबरोबर तब्बल ६५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहनचालकांमधील स्वयंशिस्तीच्या अभावामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अतिरिक्त अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिल्या होत्या.
जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक विकास पाडळे व शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी शहर व जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली. या मोहिमेमध्ये प्रामुख्याने वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, दारू पिऊन वाहन चालविणे, महामार्गावर दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर न करणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या चालकांना कायद्याची जरब बसावी, यासाठी संबंधित वाहनचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याच्या प्रक्रियेवर पोलिसांकडून भर देण्यात आला. त्यानुसार या वाहनचालकांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित करण्याबाबतचे प्रस्ताव पोलिसांकडून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविण्यात आले. या प्रस्तावांवर कारवाई करताना उपप्रादेशिक परिवहन विभागाने ५८८ वाहनचालकांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित केले आहेत.
दंडात्मक कारवाईचा बडगाही पोलिसांनी अनेकांवर उगारला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर खटले दाखल करण्यात आले होते. या खटल्यांची लोकअदालतीमध्ये सुनावणी झाली. त्यामध्ये झालेल्या निर्णयानुसार तब्बल ६५ लाख रुपये तडजोड शुल्क भरून घेण्यात आले. या मोहिमेमुळे वाहनचालकांमध्ये वाहन चालविण्याच्या शिस्तीत वाढ होत आहे. त्याचा परिणाम सहाजिकच अपघातप्रवण क्षेत्रातील  अपघातांचे प्रमाण कमी होण्यात दिसून येत आहे. कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.