कराडात जनावरांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोन टेम्पोवर कारवाई
म्हैशी व रेडकांची सुटका : ९ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त
जनावरांची बेकायदा वाहतूक करणारे दोन टेम्पो अडवून पोलिसांनी चाळीस म्हैशी व अकरा रेडकांची सुटका केली. तसेच टेम्पोच्या दोन चालकांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवार दि.२९ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
कराड : जनावरांची बेकायदा वाहतूक करणारे दोन टेम्पो अडवून पोलिसांनी चाळीस म्हैशी व अकरा रेडकांची सुटका केली. तसेच टेम्पोच्या दोन चालकांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवार दि.२९ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पोपट हणमंत सोडभिसे (वय ५१) व अमर अर्जुन काळेल (वय ३०) दोघे रा. सोमंथळी, ता. फलटण अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड शहर वाहतूक शाखेतील हवालदार सुनिल पाटील तसेच महिला पोलीस नाईक सोनम पाटील हे दोघेजण शहरातील कृष्णा कॅनॉलवर वाहतूक नियंत्रण करीत असताना त्यांनी दोन टेम्पो अडविले. त्यावेळी वोर्लेन्टियर ध्यान फाऊंडेशनचे प्रतीक अप्पासाहेब ननावरे त्या ठिकाणी आले. संबंधित टेम्पोमधून जनावरांची बेकायदा वाहतूक केली जात असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी टेम्पोच्या हौद्याची तपासणी केली असता हौद्यात दाटीवाटीने म्हैशी भरल्याचे दिसून आले.
पोलिसांनी दोन्ही टेम्पो कराड शहर पोलीस ठाण्यात नेवून चालकांकडे परवान्याची मागणी केली. त्यावेळी दोघांकडेही परवाना नसल्याचे दिसून आले. त्यामुळे जनावरांची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांच्याकडून २९ म्हैशी, ११ रेडके आणि दोन टेम्पो असा ९ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.