छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द काढणार्या कोश्यारींना राज्यातून घालवा
आम आदमी पार्टीची मागणी : शिवतीर्थावर करण्यात आले जोडे मारो आंदोलन
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबाबत जे वादग्रस्त विधान केले, त्याचा आम आदमी पार्टीच्यावतीने सातारा शहरातील शिवतीर्थावर निषेध नोंदविण्यात आला. तसेच कोश्यारी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
सातारा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबाबत जे वादग्रस्त विधान केले, त्याचा आम आदमी पार्टीच्यावतीने सातारा शहरातील शिवतीर्थावर निषेध नोंदविण्यात आला. तसेच कोश्यारी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज असून महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने लादलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सातत्याने महाराष्ट्रातील व देशातील थोर व्यक्तींना नाहकपणे कमी लेखण्याचे उद्देशाने त्यांचे विषयी अवमानकारक
भाष्य करित आहेत. त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि आता तर छ. शिवाजी महाराज यांच्याबद्दल देखील अवमानकारक भाष्य करून त्यांनी संपूर्ण देशातील शिवप्रेमींच्या भावना दुखविलेल्या आहेत. म्हणूनच याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टी व सातारा जिल्ह्यातील शिवप्रेमींनी शिवतीर्थ पोवई नाका, येथे एकत्र येवून भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. तसेच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनी देखील छ. शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आलेला आहे.
यावेळी बोलताना आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर म्हणाले, राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या कोश्यारी यांनी प्रथम शिवचरित्राचे वाचन करुन मगच त्यांच्याविषयी बोलावे. छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रच नव्हे तर देश घडवला. त्यांच्याविषयी कोश्यारी यांनी केलेले विधान मराठी माणसाला संताप आणणारे आहे. याबाबत कोश्यारी यांनी तमाम महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी. तसेच भारतीय जनता पक्षाने कोश्यारी यांची उचलबांगडी करुन हे पार्सल त्यांच्या राज्यात पुन्हा पाठवून द्यावे.
यावेळी आम आदमी पार्टी प. महा. खजिनदार सागर भोगावकर, जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, जिल्हा सचिव मारुती जानकर, जिल्हा संघटक महेंद्र बाचल, रतन पाटील, सातारा शहराध्यक्ष जयराज मोरे, सादिक शेख, संदिप ननावरे, संदिप माने, गणेश वाघमारे, संजय पवार आदी शिवप्रेमी उपस्थित होते.