शालेय पोषण आहार युनियनचे साताऱ्यात महा अधिवेशन
न्यू इंग्लिश स्कूल येथे होणार अधिवेशनाचे ठराव
आयटक सलग्नित महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचे दिनांक 18 व 19 नोव्हेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल येथे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
सातारा : आयटक सलग्नित महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचे दिनांक 18 व 19 नोव्हेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल येथे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 400 प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती युनियनचे राज्यसचिव कॉम्रेड शौकतभाई पठाण व राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड भगवानराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आयटक कौन्सिल सदस्य कॉम्रेड कविता उमाप, कॉम्रेड विठ्ठल सुळे, कॉम्रेड शिवाजीराव पवार, दिगंबर इनामके, अजय नलावडे, संदीप माने, संजय पाटील, इत्यादी उपस्थित होते.
भगवानराव पाटील पुढे म्हणाले या अधिवेशनामध्ये शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचे समस्यांचा आढावा घेतला जाणार आहे . समान वेतन कायद्याप्रमाणे पोषण आहार कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढवला जाणे गरजेचे आहे . या क्षेत्रात कार्यरत महिलांना दहा महिन्याचा करार करून अत्यंत कमी मानधन दिले जाते .सेंट्रल किचन पद्धत रद्द करावी, दिवाळी बोनस म्हणून दोन महिन्याचा पगार मंजूर व्हावा, किमान वेतन 21 हजार रुपये आणि त्याचा निर्णय होईपर्यंत किमान वेतन दहा हजार रुपये मिळावे, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, केंद्र सरकारची 60 टक्के वाढ 2014 पासून ची फरकासह मिळावी, दरवर्षी करारनामा न करता कामावर लागले पासून नियुक्तीपत्र देण्यात यावी, मासिक पेन्शनं मिळावी, शालेय पोषण कर्मचारी यांना कायम सेवेत घेण्यात यावे, शाळा व परिसर स्वच्छता ही अट रद्द करावी, स्वयंपाक कर्मचारी कर्तव्य बजावताना मृत्यू पावल्यास पंचवीस लाख रुपये विमा मिळावा इत्यादी मागण्यांचे ठराव या महा अधिवेशनामध्ये करण्यात येणार आहेत.
या अधिवेशनाचे उद्घाटन आयटक संलग्नित मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 400 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली काँग्रेस भवन एसटी स्टँड जवळून पोवई नाका येथे जाणार आहे. तेथे शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर शाहू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून रॅली अधिवेशनस्थळी न्यू इंग्लिश स्कूल येथे दुपारी बारा वाजता पोहोचेल.