राज्यात लॉकडाऊन लागू होणार नाही. मात्र, निर्बंध कठोर होणार आहेत. याबाबतचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीत हा निर्णय झालाय.
मुंबई : राज्यात लॉकडाऊन लागू होणार नाही. मात्र, निर्बंध कठोर होणार आहेत. याबाबतचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीत हा निर्णय झालाय.
राज्यात कोरोनाचा बाधितांचा आकडा वाढत आहे. आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात कोरोना विषयावर महत्वाची बैठक झाली. या बैठकीला अजित पवारांसह आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव, आरोग्य सचिव, सार्वजनिक आरोग्य आयुक्त व्हीसीद्वारे उपस्थित होते. यावेळी लॉकडाऊन ऐवजी कठोर निर्बंध लागू करण्याचे ठरले.
राज्यासाठी नवे आदेश लागू करणार आहोत, असे यावेळीव अजित पवार यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा होकार आल्यावर नवे निर्बंध लावणार आहेत, असे अजित पवार म्हणाले. हे निर्बंध सर्व जिल्ह्यांसाठी जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्यात लॉकडाऊन करण्याची गरज नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्याचवेळी कोरोना निर्बंध आणखी कठोर करण्याच्या निर्णयावर सर्वांचे आढवा बैठकीत एकमत झाले. आता या बैठकीतील माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली जाईल. त्यानंतर बुधवारी संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची नियमावली जारी होऊ शकते.
निर्बंधांमध्ये वाढ होणार असली तरी लॉकडाऊन लागण्याची धास्ती संपली आहे. लॉकडाऊन लावल्यास राज्याचे अर्थचक्र थांबू शकते. राज्य सरकार हा धोका पत्कारायला तयार नाही. त्यामुळे सरकार अजूनही लॉकडाऊन लावण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र, करोठ निर्बंध लावण्यात येणार आहेत. तशी आज नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच केंद्र सरकारप्रमाणे 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्याची शक्यता आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, सिनेमा गृहात उपस्थिती 50 टक्के होण्याची शक्यता आहे.