maharashtra

...तर सहा. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या कारभाराबाबत जनआंदोलन उभे करणार

सामाजिक संस्थांचा इशारा

सातारा जिल्ह्यातील सहा धर्मादाय आयुक्त या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मनमानी कारभार करत आहेत. जाणीवपूर्वक त्रास देणे, मनमानीपणे तारखा देणे, विनाकारण पक्षकारांची प्रस्ताव नामंजूर करणे, आर्थिक तडजोडी करणे, त्या न झाल्यास फौजदारी कारवाई करण्याचे सांगितले जाते आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातील सहा धर्मादाय आयुक्त या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मनमानी कारभार करत आहेत. जाणीवपूर्वक त्रास देणे, मनमानीपणे तारखा देणे, विनाकारण पक्षकारांची प्रस्ताव नामंजूर करणे, आर्थिक तडजोडी करणे, त्या न झाल्यास फौजदारी कारवाई करण्याचे सांगितले जाते आहे. याबाबत या कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांची खातेनिहाय सखोल चौकशी करून, पक्षकार, सामाजिक संस्था, संघटना यांना न्याय द्यावा. संबंधीत सहाय्यक धर्मादाय आयुक्त या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर चौकशी अंती 30 नोव्हेंबरपर्यंत कारवाई न झाल्यास अथवा योग्य निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व संस्था, संघटना, पक्षकार यांच्यासमवेत जनआंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्दारे जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे, माजी उप नगराध्यक्ष शंकर माळवदे, सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे, पत्रकार पद्माकर सोळवंडे यांनी दिला आहे.
निवेदनात, न्यासाचे लेखापरिक्षण धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार, परिपत्रकानुसार त्यांच्या संकेतस्थळावर न्यासांनी दाखल केले. नंतर कार्यालयात जावून दाखल करतेवेळी संबंधित कार्यालयाचे कर्मचारी, अधिकारी अनेक त्रुटी जाणूनबूजून दाखवून पक्षकारांना नाहक त्रास देत आहेत. तसेच लेखापरिक्षण अहवाल संकेत स्थळावर दाखल केल्यानंतर पुन्हा समक्ष घेण्याची जरूरत नाही किंवा त्यासाठी संकेतस्थळ अथवा समक्ष देण्यापैकी एकच पर्याय असावा. त्याप्रमाणे आदेश निर्गमित व्हावेत. निरीक्षकाने केलेल्या चौकशी अहवालावर त्वरीत निर्णय घेण्याऐवजी वर्षानुवर्ष न्यायिक स्वरूपाचे कामकाज चालवतात. त्यामुळे भ्रष्टाचारास खतपाणी घालण्याचा प्रकार होत निरीक्षकाचा अहवालावर निर्णय घेण्याची कालमर्यादा ठरविण्यात यावी. न्यासांच्या गैरकारभारा विरूध्द केलेल्या तक्रारी, चौकशी वर्षांनुवर्ष कर्मचार्‍यांच्या दप्तर दिरंगाई, वेळकाढूपणा, आर्थिक तडजोडीमुळे प्रलंबित आहेत. सातारा कार्यालयात सहा. धर्मादाय आयुक्त यांची 2 पदे मंजूर असताना गेली अनेक वर्षे सहा. धर्मादाय आयुक्त 1 च पद कार्यरत आहे. तरी 2 रे पदावर सहा. धर्मादाय आयुक्त यांची नियुक्ती करण्यात यावी.
कार्यालयीन उच्च पदस्थ अधिकारी, कर्मचारी वर्ग हे मनमानीपणे सुनावण्याचा तारखा नेमणे, निकालाची भिती दाखवून त्यांच्याकडून वाहनांची सोय करून घेणे, पर्यटनस्थळी जावून आनंद उपभोगणे वगैरे केल्या जात आहेत. याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे झाले आहे.
सहा. धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये अनेक पक्षकार, वयोवृद्ध दिव्यांग हे कामकाजासाठी येत असतात परंतु वेगवेगळी कारणे सांगून प्रस्ताव नामंजूर केले जातात. तसेच सातारा नगरपरिषदेने संबधित कार्यालयाचा बांधकाम परवाना मंजूर करून अनेक वर्ष उलटली तरी काम संथ गतीने सुरू आहे त्याचा त्रास दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना होत आहे तरी बांधकाम त्वरित पूर्ण करावे.
तसेच नामजूंर प्रस्तावांची सखोल चौकशी करण्यात यावी. अधिकारी, कर्मचार्‍यांना सौजन्य काय असते याबाबत शिक्षण देणे जरूरीचे आहे.. पक्षकारांना दमदाटीची, भिती दाखवली जात आहे. गणेशोत्सव, दुर्गात्सवावेळी शासनाच्या आदेशांचे व धर्मादाय आयुक्तांच्या परिपत्रकांना डावलून नाहक त्रास दिला जातो, आर्थिक तडजोडी केल्या जातात याचीही चौकशी करण्यात यावी. या सर्व मुद्यांची खातेनिहाय सखोल चौकशी करून, पक्षकार, सामाजिक संस्था, संघटना यांना न्याय देऊन संबंधितावर कारवाई करावी. निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, धर्मादाय आयुक्त मुंबई, पोलीस अधीक्षक समीर शेख यांना देण्यात आल्या आहेत.