कॅबिनेट मंत्र्यांना राज्यमंत्र्यांचे बंगले; निवासस्थानाच्या वाटपावरून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी
Maharashtra Cabinet: मंत्र्यांसाठी देण्यात आलेल्या बंगल्यांवरून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस गटातील मंत्र्यांंमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.
Maharashtra Cabinet: भाजप शिवसेना युतीमध्ये राष्ट्रवादीचे नऊ मंत्री सत्तेत सहभागी झाले खरे मात्र बारा दिवस उलटून गेल्यानंतर ही खातेवाटप झालेलं नाही. खाते वाटप झालं नसलं तरी मंत्र्यांना दालन आणि निवासस्थानांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, ज्या मंत्र्यांनी वर्षानुवर्ष मंत्री पद भूषवली त्या मंत्र्यांना राज्यमंत्री दर्जाची निवासस्थाने देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.
राज्याच्या राजकारणामध्ये सर्वाधिक सक्रिय असणाऱ्या नेत्यांपैकी आणि जास्तीत जास्त मंत्रीपद भूषवलेल्या मंत्र्यांपैकी राष्ट्रवादीमध्ये अनेक नेत्यांची नावे अग्रगण्य पाहायला मिळतात. उपमुख्यमंत्री पद भूषवलेले छगन भुजबळ अनेक महत्त्वाची मंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्ष पद भूषवलेले दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ या सर्वांची नावे घेतली जातात. मात्र, भाजप-शिवसेनेच्या युतीत सहभागी झाल्यानंतर याच मंत्र्यांची कुचंबना होत असून नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिपदाची शपथ घेऊन बारा दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही खाते वाटप झालेलं नाही. तर दुसरीकडे मात्र शिवसेना-भाजपचे मंत्री राज्याचा गाडा जोरदारपणे हाकताना दिसत आहेत.
मंत्रिमंडळाचे खाते वाटप झालेले नाही. त्यामुळे कुठलं खातं कोणाच्या वाटेला येईल. याची या मंत्र्यांना धाकधूक आहे. मात्र याच खातेवाटपाच्या आधी मंत्र्यांना वाटप झालेली निवासस्थान आणि दालने यावरुन नाराजी पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री किंवा कमी महत्त्वाच्या खात्यांच्या मंत्र्यांना जी निवासस्थानी दिली होती. ती आता आता राष्ट्रवादीच्या टॉपच्या मंत्र्यांना दिल्याने नाराजी वाढताना पाहायला मिळते.
>> कोणत्या मंत्र्यांना कोणत्या बंगल्यांचे वाटप?
- दिलीप वळसे-पाटील
दिलीप वळसे पाटलांनी गेल्या अनेक वर्षात अतिशय महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. विधानसभा अध्यक्ष म्हणूनही कार्यकाळ पाहिलेला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. त्यावेळी त्यांना शिवगिरी हा मलबार हिलचा बंगला निवासस्थान म्हणून देण्यात आला होता. आता मात्र मंत्रालयाच्या समोर सुवर्णगड हे निवासस्थान देण्यात आलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुलाबराव पाटील यांना हा बंगला देण्यात आल होता. याआधी अनेक राज्यमंत्र्यांना हे निवासस्थान देण्यात आलं होतं.
- छगन भुजबळ
छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे महत्त्वाचे मंत्री राहिलेले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदापासून ते अनेक मंत्री पदे भुषवलेली आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे रामटेक हा मलबार हिल येथील बंगला निवासस्थान म्हणून होतं. आता युती सरकारच्या काळात मात्र मंत्रालय समोरचा सिद्धगड हे निवासस्थान देण्यात आलेले आहे. महाविकास आघाडीच्या काळात सिद्धगड हे निवासस्थान यशोमती ठाकूर यांना देण्यात आले होते.
- हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ यांनी महत्वाची खाती सांभाळलेली आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ग्रामविकास खातं सांभाळलं आहे. या सरकारच्या काळात 'विशालगड' हे निवासस्थान देण्यात आलेले आहे. हे निवासस्थान याआधी राज्यमंत्र्यांना देण्यात आले होते.
- धनंजय मुंडे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे. या सरकारमध्ये त्यांना मंत्रालय समोरील प्रचितगड निवासस्थान देण्यात आलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे निवासस्थान बाळासाहेब पाटील यांना देण्यात आलेलं होतं. त्याच्या आधी अनेक राज्यमंत्र्यांनी हे निवासस्थान देण्यात आले होते.
- धर्मरावबाबा आत्राम
याआधी मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. या सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री देण्यात आले आहे. मात्र, कॅबिनेट मंत्री असतानाही सुरुची या इमारतीमध्ये त्यांना निवासस्थान म्हणून सदनिका देण्यात आलेली आहे.
- अनिल पाटील
अनिल पाटील यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. मात्र, त्यांनाही सुरुची इमारतीमध्ये सदनिका निवासस्थान म्हणून देण्यात आलेले आहे. 'सुरुची' मध्ये मुख्यत: राज्यमंत्री यांना निवासस्थान दिले जाते.
- संजय बनसोडे
संजय बनसोडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री होते. या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. मात्र, राज्यमंत्री असताना सुरुची इमारतीमध्ये निवासस्थान दिले होते आताही तेच कायम केले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार याला अपवाद आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून देवगिरी निवासस्थान होतं. विरोधी पक्ष नेते असतानाही आणि आता पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवगिरी निवासस्थान कायम केलेले आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वरिष्ठ मंत्र्यांची यादी पाहिली तर छगन भुजबळ हे चौथ्या क्रमांकावरती आहेत. दिलीप वळसे पाटील हे सातव्या क्रमांकावर आहेत. हसन मुश्रीफ नव्या क्रमांका वरती आहेत. तर धनंजय मुंडे हे विसाव्या क्रमांकावरती आहेत. मात्र, निवासस्थाने पहिली तर राज्यमंत्री किंवा कमी दर्जाच्या मंत्र्यांची दिलेली आहेत. त्यामुळे नाराजी ही पाहायला मिळत आहे.