पुसेगाव : पुसेगाव बाजारपेठेतून जाणाऱ्या सातारा-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम पोलीस स्टेशन ते येरळा नदीपर्यंत अनेक दिवसांपासून रखडले आहे. सदरचा रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सतत निर्माण होत असतो. पुसेगाव मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा प्रशासकीय यंत्रणा व संबंधित ठेकेदारच्या विरोधात दि. १० फेब्रुवारी रोजी पुसेगाव येथील छ. शिवाजी चौकात रस्ता रोको करणार असल्याचा इशारा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
डॉ. सुरेश जाधव म्हणाले, सातारा-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे पुसेगाव बाजारपेठेतील रखडलेले काम पूर्ण व्हावे यासाठी श्री सेवगिरी देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी व प्रांताधिकार्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. प्रांताधिकाऱ्यांनी पुसेगाव येथे बाधित ग्रामस्थांची बैठक घेऊन या कामसंदर्भात सहकार्य करावे, असे आवाहन केले होते. पोलीस स्टेशन ते येरळा नदीपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असणारी बारा मीटर जागा बांधकाम विभागाने एम. एस. आर. डी. कडे वर्ग केली असल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी बैठकीत नमूद केले होते.
सदरचा रस्ता व्हावा ही सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे. याबाबत बधितांची देखील सहकार्याची भावना आहे. मात्र बधितांना शासनाच्या नियमाप्रमाणे नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. परंतु, शासकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ती जागा शासनाची असेल तर शासकीय महसूल अधिकारी पोलिस यंत्रणा ती जागा रस्त्यासाठी मोकळी करून का घेत नाही. रस्त्याचे काम व्हावे म्हणून आम्ही बधितांसोबत वारंवार बैठक घेऊन प्रशासनास सहकार्य करीत आलो आहोत. शासकीय अधिकाऱ्यांनी देखील सहकार्याची भावना ठेवून, हा प्रश्न निकाली काढावा. आणि ग्रामस्थांना धूळ व ट्रॅफिकच्या समस्येपासून होणारा त्रास थांबवावा.
प्रशासनाने ९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत उर्वरित रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली नाही तर १० फेब्रुवारी २०२२ रोजी शासकीय अधिकारी व ठेकदाराचा निषेध म्हणून काळे झेंडे लावून छ. शिवाजी चौकामध्ये रस्ता रोको केला जाईल. त्यावेळी होणाऱ्या परिणामास शासकीय यंत्रणा जबाबदार राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे
गावातील पोलीस स्टेशन ते येरळा नदीपर्यंतच्या रस्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. पुसेगावाच्या सर्वांगीण विकासासाठी या रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. तसेच रस्ता होत असताना या ठिकाणच्या बधितांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका असणार आहे.
-डॉ. सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस.