म्हसवडच्या फार्मसी कॉलेजच्या सचिवाची मुजोरी
कॉलेजच्याच होस्टेलवर राहण्याची सक्ती, नाही राहिलेस बघून घेणेची भाषा, प्रकरण पोलिसांपर्यंत
म्हसवड येथे असलेल्या माणदेश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अॅन्ड रिसर्च सेंटरच्या फार्मसी कॉलेजमध्ये सचिवाच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी वैतागले असून या छळप्रकरणी 14 विद्यार्थ्यांनी थेट म्हसवड पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
म्हसवड : येथे असलेल्या माणदेश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अॅन्ड रिसर्च सेंटरच्या फार्मसी कॉलेजमध्ये सचिवाच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी वैतागले असून या छळप्रकरणी 14 विद्यार्थ्यांनी थेट म्हसवड पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी, या कॉलेजमध्ये माण तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक मुलं-मुली शिक्षण घेत असून कॉलेजकडून विद्यार्थ्यांसाठी खासगी इमारतीत वसतिगृहाची सोय केली आहे. परंतु, तेथे पर्याप्त सुविधा नसल्याचा अनेक विद्यार्थिनींचा आरोप आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थिनींनी तेथे न रहाता दुसरीकडे खासगी वसतिगृहात राहणे पसंत केले. त्यामुळे हे कॉलेज चालविणार्या ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीचे सचिव दादासाहेब कोडलकर यांचे पित्त खवळले. त्यांनी या बाहेरच्या वसतिगृहात राहणार्या विद्यार्थिनींना दररोज दमदाटी करण्याचा प्रकार सुरु केला. ‘कॉलेजच्या आवारात का आलीस, तुझा या महाविद्यालयाशी संबंध नाही’, अशा शब्दात कोडलकर पाणउतारा करत होते. शिवाय नाहक कारणावरून विद्यार्थिनींची कोंडी करत होते.
लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन शिक्षण सुरु होते. त्या काळात त्रास देण्याच्या हेतूने विद्यार्थिंनींना कॉलेजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधूनही रिमूव्ह करण्यात आले. तसेच यासंबंधी विचारणा करण्यासाठी गेल्यावर संबंधित विद्याथीर्र्नीला दमदाटी करून अरेरावीची भाषा वापरली तसेच शाळेच्या दाखल्यावरती लाल शेरा देऊन अॅडमिशन रद्द करण्याची धमकी दिली.
यासंबंधी विद्यार्थिनींनी चित्रीकरण तसेच अन्य सर्व पुरावे जोडून या छळाबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांनाही पाठवले आहे.
दरम्यान, पीडित विद्यार्थिंनीनी याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्यादही दाखल केली आहे.
कॉलेजमध्ये उपयुक्त सामुग्री न देणे, व्हॉट्सअॅप गृपमधून रिमूव्ह करणे, परीक्षेस बसू न देणे, रात्री अपरात्री फोन करून दमदाटी करणे आदी तक्रारी या फिर्यादीत नमूद करण्यात आल्या असून पोलीस तक्रारी झाल्यानंतर विद्यार्थीनींना परीक्षेस बसू देण्यात आले.
भोंगळ कारभार
सध्या या संस्थेत मोठा भोंगळ कारभार सुरु असून सचिवाच्या हाती सर्व कारभार असल्याचे समजते. तसेच संस्थेविषयी काही बाबी न्यायप्रविष्ठ असल्याची चर्चा असून सचिव हाच मालक असल्याच्या तोर्यात वागत असल्याचा आरोप अनेक विद्यार्थ्यांनी केला आहे. शिवाय त्याच्या धाकामुळे शाळेतील शिक्षक वर्गही खासगीत याबाबत चर्चा करत आहे. एकंदरीतच या कारभारामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकमंत्री तसेच जिल्हाधिकार्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची गरज आहे. येत्या काळात यात सुधारणा झाल्या नाहीत तर मोठे आंदोलन उभे राहण्याचीही शक्यता अनेकांनी बोलून दाखवली. दरम्यान, यासंदर्भात दादासाहेब कोडलकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.