maharashtra

महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता


Maharashtra is likely to be hit by unseasonal rain again
एप्रिल महिन्याअखेरीस पावसाचा अंदाज

साहस वार्ता
मुंबई (वृत्तसंस्था):  एप्रिल महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एप्रिलच्या शेवटाला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकणातील तापमान पुढील दोन-तीन दिवस कोरडे राहण्याची शक्यता आहे. दमट हवा, अधिक आर्द्रता आणि तापमानामुळे कोकणात अधिक उष्ण आणि अस्वस्थ वातावरण राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात देखील परिणाम जाणवण्याचा अंदाज आहे, ज्यात तापमान जरी कमी असलं तरी आर्द्रतेमुळे अधिक तापमान वाटू शकतं.
विदर्भात पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज कायम
विदर्भात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज कायम आहे. विदर्भात आज (21 एप्रिल) आणि उद्या (22 एप्रिल) काही ठिकाणी वादळी वार्‍यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बुलढाण्यात 60 ते 70 घरांवरील छप्पर उडाले
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव परिसरात काल दुपारी वादळी वार्‍यासह तुफान अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास तीन तास या परिसरात वादळी वार्‍याने आणि पावसाने धुमाकूळ घातला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आलेल्या चक्रीवादळाने संग्रामपूर गावातील जवळपास 60 ते 70 घरावरील छप्पर उडून गेली. यात मातीचे
कौले सुद्धा उडून गेले. त्यामुळे या सर्व नागरिकांना रात्रभर उघड्यावर रात्र काढण्याची वेळ आली. मात्र प्रशासनाने अद्यापही याची दखल घेतली नसल्याने नागरिक संतप्त आहेत. नागरिकांना पावसात रात्रभर उघड्यावर रात्र काढावे लागले. अनेकांची तीन पत्रे एक ते दीड किलोमीटर पर्यंत उडून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.