‘हिंगणगाव’च्या अनिकेतचा लॉकडाऊन काळात गरजूंना मदतीचा हात..!
मुंबईच्या माण खुर्दमध्ये जीवनावश्यक वस्तूंचं केलं वाटप; विधायक उपक्रमाची सामाजिक संस्थांनी घेतली दखल
जगात कोरोना महामारीनं थैमान घातल्यामुळं संसर्ग टाळण्यासाठी शासनानं सर्वत्र ‘लॉकडाऊन’ जाहीर केलं. त्यामुळं सर्वांना ‘घरबंद’ व्हावं लागलं. दरम्यानच्या काळात सर्व उद्योग-धंदे बंद पडले. त्यामुळे हातावर पोट असणार्यांवर उपासमारीची वेळ आली. त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. पण समाजात अशी काही माणसं असतात की, ज्यांच्यात समाजाप्रती काहीतरी नवं करून दाखवण्याची तळमळ असते. अशाच एका तरुण ‘कोरोना योद्ध्या’नं लॉकडाऊन काळात मुंबई माण खुर्द शिवाजीनगर येथील गरीब-गरजूंना मदतीचा हात अन् मायेची ऊब देऊन समाज
विकी जाधव
सातारा : जगात कोरोना महामारीनं थैमान घातल्यामुळं संसर्ग टाळण्यासाठी शासनानं सर्वत्र ‘लॉकडाऊन’ जाहीर केलं. त्यामुळं सर्वांना ‘घरबंद’ व्हावं लागलं. दरम्यानच्या काळात सर्व उद्योग-धंदे बंद पडले. त्यामुळे हातावर पोट असणार्यांवर उपासमारीची वेळ आली. त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. पण समाजात अशी काही माणसं असतात की, ज्यांच्यात समाजाप्रती काहीतरी नवं करून दाखवण्याची तळमळ असते. अशाच एका तरुण ‘कोरोना योद्ध्या’नं लॉकडाऊन काळात मुंबई माण खुर्द शिवाजीनगर येथील गरीब-गरजूंना मदतीचा हात अन् मायेची ऊब देऊन समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे...त्याच अनिकेत भोईटेची ही प्रेरणादायी कोरोना कहाणी...
अनिकेत भोईटेचं मूळ गाव फलटण तालुक्यातील ‘हिंगणगाव’. पण तो सध्या शिक्षण अन् नोकरीनिमित्त मुंबईतील माण खुर्द शिवाजीनगरमध्ये वास्तव्यास आहे. अनिकेत हा बी. कॉमच्या तृतीय वर्षाचं शिक्षण घेत एका मार्केटिंग कंपनीत कामाला जायचा. पण कोरोनामुळं सर्वत्रच 22 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळं अनिकेतचं कॉलेज अन् नोकरीही बंद झाली. या काळात अनेक उद्योग-धंदे ठप्प झाले. गरिबांवर उपासमारीची वेळ आली. त्यासंदर्भात सोशल मीडियावर ‘गरीब-गरजूंना मदत करावी’ अशा आशयाचे मेसेजेस व्हायरल होऊ लागले.
मुळातच अनिकेतला समाजातील गरीब-गरजूंबद्दल कायमच तळमळ होती. अन् त्याच तळमळीनं त्याला लॉकडाऊन काळात गरजूंना मदत करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मदतीसंदर्भात अनिकेतनं आपल्या मित्रांशी चर्चा केली. अन् सुरू झालं अनिकेतचं कोरोना काळातील मदत कार्य...
प्रारंभी अनिकेतनं माण खुर्द शिवाजीनगर परिसरातील गरीब-गरजू कुटुंबांना कोरोनाचे सर्व नियम पाळून अन्नधान्याच्या कीटचे वाटप केले. त्यानंतर कोरोना काळात नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी ‘होमिओपॅथिक अर्सेनिक अल्बम’ गोळ्यांचे वाटप केले. तसेच परिसरातील तीनशे जणांची दोन वेळच्या जेवणाचीही सोय केली. दरम्यानच्या काळात अनिकेतच्या सामाजिक कार्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली. त्याला इतर अनेक ठिकाणांहून गरजूंच्या मदतीसाठी फोन येऊ लागले. त्यावेळीही अनिकेत नव्या जोमानं त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला. तसेच काही कालावधीनंतर शासनानं लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता दिल्यानंतर अनिकेतनं ‘रक्तदान शिबिरा’चं आयोजन करून गरजूंना नवसंजीवनी दिली.
या काळात अनिकेत व त्याच्या मित्रपरिवारानं केलेलं काम पाहून परिसरातील नागरिकांच्या चेहर्यावरील आनंद बरंच काही सांगून जात होता. तो आनंद म्हणजे अनिकेतनं केलेल्या सामाजिक कार्याची पोच पावतीच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही..
अनिकेतनं लॉकडाऊन काळात केलेल्या या विधायक उपक्रमाची माण खुर्द शिवाजीनगरसह परिसरातील सामाजिक संस्थांनी दखल घेऊन त्याला ‘कोरोना योद्धा’ पुरस्कारानं सन्मानित केलं. अशा या सामाजिक बांधिलकीचं व्रत जोपासणार्या अनिकेतच्या प्रेरणादायी कार्याला सलाम..!
सामाजिक कार्यात मित्रांचा पाठिंबा...
लॉकडाऊन काळात अनिकेत भोईटेनं मुंबईतील गरीब-गरजूंना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. या कार्यात त्याला सुशील सिंह, विजय गुप्ता, विक्रम जाधव, सुबोध घाडगे, अविनाश भोईटे, राकेश माने, अनिल माने, मयूर कुडाळपे या मित्रांचा अमूल्य पाठिंबा लाभला.
पूरग्रस्तांवरही पांघरली मायेची शाल...
गतवर्षीच्या महापुराने सांगली-मिरज परिसराला मोठा फटका बसला. महापुरात अनेक लोक अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात अनिकेत व त्याच्या मित्रांचा सहभाग महत्त्वाचा होता. तसेच अनिकेतनं पुरात सुरक्षित असलेल्या नागरिकांना अन्नधान्य, ब्लँकेटसह अन्य वस्तूंचं वाटप करून पूरग्रस्तांवर मायेची शाल पांघरली..