सातारा शहराला वरदायिनी ठरणाऱ्या कास धरणाच्या नवीन जलवाहिनीच्या कामास पालिकेकडून प्रारंभ करण्यात आला आहे.
सातारा : सातारा शहराला वरदायिनी ठरणाऱ्या कास धरणाच्या नवीन जलवाहिनीच्या कामास पालिकेकडून प्रारंभ करण्यात आला आहे. सध्या जलवाहिनी एकमेकांना जोडण्याचे काम सुरू असून, पुढील आठवड्यात धरणातून बाहेर येणाऱ्या आऊटलेटला नवीन जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
सातारा पालिकेच्या माध्यमातून कास धरणाची उंची वाढविण्यात आली असून, पाणीसाठ्यात ०.१ टीएमसीवरून ०.५ टीएमसी इतकी वाढ झाली आहे. उंची वाढीचे काम पूर्णत्वास आल्याने पालिकेने पाणीसाठ्याच्या सुयोग्य वितरणासाठी जुन्या बंदिस्त जलवाहिनीला समांतर व नवीन जलवाहिनीचे काम हाती घेतले आहे. धरणापासून सातारा शहरापर्यंत तब्बल २७ किलोमीटर लांब जलवाहिनी बसविली जाणार असून, या कामास नुकताच प्रारंभ झाला आहे. धरणावर सुमारे तीन हजार मीटर लांबीची जलवाहिनी पोहोच झाली आहे. या शिवाय अन्य यंत्रसामुग्री टप्प्याटप्प्याने दाखल होत आहे. सध्या जलवाहिनी एकमेकांना जोडण्याचे काम सुरू झाले असून, काही दिवसांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून धरणाच्या आऊटलेटला नवीन जलवाहिनी जोडली जाणार आहे.
पहिल्या सहा किलोमीटरचा टप्पा अवघड
धरणापासून पुढील सहा किलोमीटरचा टप्पा हा डोंगर-दऱ्यांचा व जंगलव्याप्त आहे. पावसामुळे या भागात यंत्रसामुग्रीद्वारे काम करणे कठीण बनले आहे. पावसाने पूर्ण उघडीप दिल्यानंतरच येथील कामास गतीने प्रारंभ होणार आहे.असा आहे प्रकल्प
१. नवीन जलवाहिनीचा अंदाजपत्रकीय खर्च १०२ कोटी ५६ लाख इतका आहे. वेगवेगळ्या व्यासाची सुमारे २७ किलोमीटर लांबीची जलवाहिनी धरणापासून सातारा शहरापर्यंत आणली जाणार आहे.
२. जलवाहिनीबरोबरच पॉवर हाऊस येथे १० लाख लिटर क्षमतेची पाणीसाठवण टाकी उभारली जाणार आहे. १६ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहे.
३. पावर हाऊस येथे एक मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत केंद्र सुरू केले जाणार असून, विजेसाठी उंचावरून येणाऱ्या जलवाहिनीतील पाण्याचा उपयोग केला जाणार आहे.